लग्न - दोघांचा निर्णय

                  परवा दम लागागे हैशा मूवी बघितला.. त्यामधील आयुष्यमान आणि भूमी ची भूमिका वाखाणण्याजोगी आहे..त्या मूवी चा विषय हा  रोजचाच आहे पण हलकाफुलका आहे .. मुलाचे त्याच्या मनाविरुद्ध लग्न होते एका लठ्ठ मुलीशी . आधी तो तिला बरोबर घेऊन जायला पण लाजायचा... पण हळूहळू त्याला ती कशी आवडायला लागते याचे मस्त आणि सध्या स्वरूपात वर्णन केले आहे..  असे बरेच मुलं मुली असतात ज्यांचे त्यांच्या मनाविरुद्ध लग्न होते. काही लोक या मूवी प्रमाणे चांगल्याने निभावतात आणि काही आयुष्यभर रडत राहतात... यात घरचे पण तेवढेच दोषी! कारण दोघांपैकी एक जरी खुश नसेल तरी दुसऱ्याचे आयुष्य वाया..  लग्न हा मोठा निर्णय असतो खरा.. त्यामध्ये मुलामुलींवर कोणतीही जबरदस्ती करून चालत नाही कारण त्या दोघांनाच पुढे सोबत राहायचे असते,, जर  ती मुलगा किंवा मुलगी स्वतःच्या बायको ला किंवा नवऱ्याला सगळ्या लोकांसमोर घेऊन जायला तयार नसतील किंवा त्यांना त्याची लाज वाटत असेल तर त्यांनी लग्न करूच नये कारण जर तुम्हीच तुमच्या नवरा किंवा बायको ला रिस्पेक्ट दिला नाही तर बाकीचे तरी कसे देतील..
              आणि काही महाभाग असे असतात कि  ज्यांच्यावर कोणतेहि  बंधन नसते लग्नाबाबत ..पण त्यांना स्वतःचा निर्णय स्वतः घेता येत नाही.. आणि मग ते स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतात आणि मग माझे जबरदस्ती लग्न केले म्हणून घरच्यांना दूषणे देतात.. आधी १०० मुली नाकारायच्या कारण प्रत्येकीमध्ये काही न काहीतरी कमी.. कोण बुटकी आहे कोण सावळी आहे कोण कमी शिकलेली .. वगैरे वगैरे.. मग शेवटी वय वाढायला लागले कि कोणत्याही मुलीला हो म्हणायचे.. आणि मग स्वतःच्याच लग्नात आभाळ कोसळल्यागत चेहरा पडून बसायचे.. म्हणजे सगळे लोक म्हणतात कि बिचाऱ्याचे कसे झाले न.. तो किती भारी दिसतो त्या मानाने मुलगी तशी डावरी च आहे.. पण हा निर्णय त्याचा स्वतःचा होता न.. त्याच्यावर कोणाचे बंधन नव्हते.. मग ?? ८-९ महिन्यांच्या कोर्टशिप नंतर तुम्ही लग्न करता म्हणजे तुम्ही एकमेकांना चांगल्याने ओळखता.. आणि सुरवातीला म्हणतात कि मला लूक्स मॅटर करत नाहीत.. आणि मग लग्नानंतर तुम्ही तुमच्या बायकोशी कोणाला इंट्रोड्युस करत नाहीत का तर तुम्हाला लाज वाटते?? अरे मग तुम्ही लग्न केलेच का??  लग्न ठरून ६-७ महिने झाल्यानंतर तुम्हला कळायला लागते कि हि मुलगी मला आवडत नाही मग इतके दिवस झोप काढत होतात का?? अरे तिचा विचार करा न.. पसंत करायच्या आधीच नकार दिला असता तर हे प्रकरण एवढे वाढलेच नसते.. त्यात त्या मुलीचेच किती नुकसान.. म्हणून जोपर्यन्त तुम्हाला १०० टक्के वाटत नाही कि हाच मुलगा किंवा हीच मुलगी जिच्याशी मला लग्न करायचेय त्याशिवाय करूच नाही..  नाहीतर मग कोणाशीही झाले तरी निभावून नेता आले पाहिजे.. डिवोर्स !! नुसता मूवी मध्ये किंवा सिरिअल्स मध्ये बघायला सोप्पे वाटते पण प्रत्यक्षात ते खूप भयानक असते.. आणि मला मुलगी आवडत नाही किंवा मुलगा आवडत नाही हे काही डिवोर्स मागचा कारण असू शकत नाही.. 

तुझे आडनाव काय ?

मी कालच माझ्या मैत्रिणीला भेटले .. ती अलीकडेच हडपसर ला शिफ्ट झाली , आधी ती कोथरूड ला राहायची.. तिने तिचा कोथरूड चा अनुभव सांगितला.. ती  सोसायटी मध्ये राहायला गेल्यावरच लगेच आजूबाजूच्यांनी चौकशी सुरु केली.. काय ग कुठली आहेस तू आणि तुझे आडनाव काय?? थोडक्यात काय तर जात कोणती हे जाणून घ्यायचे होते..  ती तर वैतागूनच गेली होती . हे सांगितल्यावर मला असे झाले  कि .. जग कुठे चाललेय आणि हे कुठे ??
                 वर्तमानपत्रामध्ये हमखास बातमी दिसेल .. मुलीचे परजातीय मुलाबरोबर प्रेमप्रकरण घरी कळल्यामुळे मुलाला मारझोड..  मुलीची गळा कापून हत्या.. वगैरे वगैरे.. चित्रपटामधल्या अश्या गोष्टींना सर्वच  लोक सपोर्ट करतात .. सगळ्यांना वाटते कि आंतरजातीय विवाह करणे काही गैर नाही पण ते दुसऱ्यांच्या घरात.. स्वतःच्या घरात कोणीही खपवून घेत नाही.. आईवडिलांना मुलींची काळजी असणे साहजिकच आहे.. पण जर मुलगा खरंच चांगला असेल आणि स्वतःच्या पायांवर उभा असेल तर जातीचे बंधन ठेवणे कितपत योग्य आहे???  आणि जर त्या मुलीने  घरच्यांसाठी त्या मुलाला सोडले आणि घरच्यांच्या मनाप्रमाणे विवाह केला.. तर कशावरून तो दुसरा मुलगा चांगला असेल ?? कशावरून तो तिचा छळ करणार नाही ?? मी अश्या कित्येक केसेस ऐकल्यात आणि बघितल्यात... घरच्यांच्या जबरदस्तीमुळे लग्न केले आणि आता डिवोर्स साठी कोर्टाच्या फेऱ्या मारून मारून  चप्पल झिजवत आहेत.. एवढी उठाठेव सांगितली कुणी??
                मी लग्नाआधी एका सोसायटी मध्ये राहायचे.. तिथे एक काकू राहायच्या त्यांना दोन मुलं होती.. दोन्ही हि  लग्नाळू .. वय वाढत होती.. आणि त्यांची लग्न ठरता ठरेनात.. त्यांनी त्यांच्या जेष्ठ चिरंजीवास विचारले  कि तू प्रेम विवाह का करत नाहीस?? एखादी मुलगी बघ... कशीही असूदेत   पण आपल्या जातीमधली हवी ... हे कळाल्यावर हसूच आले.. जात बघून कोण प्रेम करते का??  आणि मग असेच वय वाढत जाते..  हल्ली मुली मिळणे पण अवघड झालेय.. आणि काय तर जातीमधलीच पाहिजे म्हणून ३०-३२  वर्षापर्यंत थांबायचे.. आणि नंतर वय वाढत चाललेय आणि मुली मिळत नाहीत म्हणून आंतरजातीय विवाह करायचा.. हे गणित कळायला  च अवघड वाटते..  हे च जर आधीच केले असते तर हि वेळ आलीच नसती..
                पहिल्या काळी प्रत्येकाच्या कामाच्या स्वरूप वेगळे होते.. आणि त्यानुसार जातीपद्धत रुजू झाली.... पण हल्ली प्रत्येक जातीमधील लोक उच्च शिक्षण घेत आहेत. ..  आपल्या आवडीनुसार प्रत्येकजण काम करत आहेत.... जर प्रत्येक जण  आपला पारंपरिक व्यापार सोडून नवीन गोष्ट शिकत आहेत तर  मग जातीपद्धत मानायची गरजच नाहीये.. पण मांजरीच्या गळ्यात घंटा बांधणार कोण.?? बाहेरच कोणी सांगायला गेले तर म्हणतात तुमच्या मुलीने आंतरजातीय विवाह केला तर चालेल का??  जर समाजाला जातीच्या चौकडीतून बाहेर काढायचे असेल तर स्वतःच्या घरापासूनच सुरवात करायला हवी..
           

कौतुक

                    आज बऱ्याचवेळ आरशासमोर रेंगाळत होते..  आज सुट्टीचा दिवस!.. त्यामुळे वेळ वेळ होता.. आरश्यात बघून मी आरामात आवरत होते आणि मनोमन स्वतःची स्तुती करत होते .. आज मी परत स्वतःच्या प्रेमात पडले होते .. बाह्यसौंदर्यामुळे नाही तर गेल्या - वर्षांमध्ये माझ्यात जो बदल झाला  त्यामुळे.. आता मी बिनधास्तकॉन्फिडन्ट आणि इंडिपेन्डन्ट आहे .. आणि आधी ज्या ज्या  गोष्टी मला जमणार नाही असे वाटायचे त्या आता मी घाबरता करू लागले आहे. . हा बदल झाला तो काही चांगल्या लोकांच्या संगतीमुळेबेतलेल्या परिस्थितीमुळे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मी ठरवले म्हणून.. 
                   "मी" ऐकून वाटत असेल हि काय स्वतःचीच स्तुती करत आहे.. पण किती कमी वेळा करतो हे आपण ?? स्वतःचे कौतुक !! नाहीतर बाकीच्यावेळेस.. ती किती सडपातळ आहे..  तो किती छान इंग्लिश बोलतो.. तिचा ड्रेसिंग सेन्स किती छान आहे.. वगैरे वगैरे..  अर्थात बाकीच्यांकडून शिकण्यासारखे बरेच असते.. पण  सांगण्याचा उद्देश असा कि स्वतःला कधीही कमी लेखू नये.. आता अमिताभ बच्चन चे बघा ना.. त्यांना रेडिओ मध्ये घेतले नाही का तर त्यांचा आवाज चांगला नव्हता.. आणि आता बघा! त्यांच्या आवाजासाठी लोक सिनेमागृहाबाहेर लाईन मध्ये तासोन्तास उभे असतात.. हे शक्य झाले ते त्यांच्या स्वतःवरच्या विश्वासामुळे.. आणि विश्वास कधी  निर्माण होतो जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखता आणि जसे आहात तसे स्वतःवर प्रेम करता तेव्हा!
                     प्रत्येक मुलीला वाटते कि मी गोरीपान आणि सुंदर असावे.. प्रत्येक मुलाला वाटते कि माझी सलमान खान सारखी बॉडी असावी.. यात गैर काही नाही पण हा विचार करण्यापेक्षा अशी  गोष्ट शोधा जी तुमच्यामध्ये आहे आणि त्यामुळे तुम्ही सुंदर व्हाल.. जसे कि लता मंगेशकर त्यांच्या आवाजामुळे .. सचिन त्याच्या क्रिकेट मधील योगदानामुळे.. पण यासाठी स्वतःवर प्रेम करा .. आजच जाऊन आरशात बघा आणि तुम्हाला देखील तुमच्यातील ती गोष्ट सापडेल जिच्यामुळे तुम्ही सुंदर आहात !!!!



प्रॉब्लेम्स

              मी अशीच शनिवारी लक्ष्मी रोड वर फिरत होते .. फिरत असताना एक छोटीशी पाटी दिसली. जीवनात त्रासलेले आहातआयुष्यात सुखी होण्याचे 101 उपाय ! संपर्क साधा "सुखिआयुष्य संस्थालक्ष्मी रॊडपुणे" .मी बघतच राहिले ... अरे आपले आयुष्य आहेदुसरा माणूस आपल्याला काय मदत करणारआणि महत्वाचे म्हणजे याची वेळच का यावी ?? खरं म्हणजे माणसाने नेहमी समाधानी आणि खुश राहायला हवे .. पण हे पुस्तकातले वाक्य झाले.. वास्तविक पाहता माणूस नुसता सुखाच्या मागे पळत असतो. आणि दुःखाचे आभाळ कोसळल्यासारखा वागत असतो.. आणि मलाच किती प्रॉब्लेम्स दिले आहेत देवाने असे कोचत बसलेला असतो..अर्थात याला माझाही अपवाद नाही..
             काही महिन्यांपूर्वीची  गोष्ट आहेमाझ्या आधीच्या कंपनी मधील एक सहकर्मचारी होता राहुलतो सारखा अमेरिका पाठवा अमेरिका पाठवा म्हणून  मॅनेजर समोर रडायचा.अर्थात त्याची तशी चूक नव्हती. सॉफ्टवेअर कंपनी मध्ये असाल तर परदेशी जाणे गरजेचे असते. तुमच्यासाठी नाही तर आजूबाजूंच्यांसाठी !! कारण तुम्हाला कंपनीमध्ये २ वर्ष पूर्ण झाली कि ,मग दूरचा मामा ,आतेभाऊ विचारतात मग काय कधी पाठवणर तुला अमेरिकेला ? असो त्या राहुलला मॅनेजर ने एकदाचे अमेरिका पाठवले आणि ते पण  चक्क ६ महिन्यांसाठी !! त्याला तिथे जाऊन २ महिने झाले न झाले तोच त्याचा मला मेसेज आला कि मला इथे फार बोर होत आहे  एकट्यालापरत तिकडे यावे वाटत आहे .. अरे मी म्हणलं आधी पाठवत नव्हते म्हणून रडायचा आणि आता तिथे बोर होतेय म्हणून रडतोय .. असे वाटले कि त्याला म्हणावे अरे हा खूप शुल्लक प्रॉब्लेम आहे .. बाहेर जरा डोळसपणे बघ म्हणजे कळेल कि किती आणि कसे प्रॉब्लेम्स असतात लोकांना..
            आम्ही इंजिनीरिंग मध्ये असल्याची गोष्ट आहे.. आम्ही एका क्लब तर्फे मुक बधिर शाळेला भेट दिली होती.त्यांच्यासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते.. आम्हाला पाहून मुलं खूप खुश दिसत होती.. एवढ्या लहान लहान मुलांनी इतकी सुंदर आणि  मनमोहक चित्र काढली हे बघून आम्ही आश्चर्यचकित झालो.. देवाने जरी त्यांना ऐकायची आणि  बोलायची क्षमता दिली नसलीतरी हातामध्ये सुंदर कला दिली आहे  ...आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ती मुलं त्यांच्याकडे नसलेल्या गोष्टींवर रडण्यापेक्षा असलेल्या गोष्टींचा पुरेपूर आनंद घेत होते.. त्यांच्याकडे बघून आपल्याकडे खूप काही आहे आणि तरी आपण रडत असतो याची जाणीव मला झाली ..आणि ती छोटीशी चिमुरडी पोरं आयुष्याचा धडा शिकवून गेली..

गोट्या, विटी दांडू आणि बरेच काही..


                  ११ ची वेळ झाली होती.. आमच्या कॉफी ब्रेक ची वेळ.. आम्ही हि वेळ कधीच चुकवत नाही. मग कितीही कामं असूदेत.. कारण रोजच्या कामाच्या गडबडीत, हिच  वेळ आम्हाला रखरखीत उन्हातल्या मंद वाऱ्याच्या झुळुकेप्रमाणे वाटते. आमची कॉफी बरोबर, क्रिकेट वर चर्चा चालू होती.. नुकतीच भारताने श्रीलंके विरुद्ध मॅच हारली होती ..कोण कसे खेळले.. कोणी कश्या चुका केल्या.. इंडियन प्रीमियर लीग मध्ये चांगली कामगिरी केलेल्या गोलंदाजांनी देखील कशी माती खाल्ली यांवर.. असाच संवाद सुरु असताना , एकजण मधेच म्हणाला , कि मी थोड्या वर्षांनी हि नोकरी सोडून गोट्या लीग काढणार!! जसे क्रिकेट, फुटबॉल,कब्बडी यांचे आहे ना  तसे.. आम्हाला थोड्यावेळ कळलेच नाही कि तो काय म्हणत आहे ते .. नंतर कळल्यावर मात्र हसू आवरता आले नाही . गोट्या लीग म्हणे!!!
                 या काळात कसल्या आल्यात  गोट्या .. गोट्या, विटी दांडू, लगोरी यासारखे खेळ आता नामशेष होत चालले आहेत.. आता मुलांना हातात मोबाईल हवा.. मग तो गावात राहणार असुदेत  कि शहरात राहणारा.. आणि  विशेष म्हणजे नुसते मोबाईल असून चालत नाही तर इंटरनेट पण हवे.. ऐकून आश्चर्य वाटले ना? मला पण असेच झाले होते.. मी माझ्या बहिणीच्या घरी राहायला गेले होते. तिला एक पाच वर्षांची मुलगी आहे . ती काही केल्या जेवायला तयार होत नव्हती. मग माझी ताई तिला जरा दरडावतच म्हणाली "जेव चुपचाप नाहीतर wi-fi बंद करेन" हे ऐकल्यानंतर मात्र तिने क्षणाचाही विलंब न लावता जेवायला सुरवात केली.. मी तर अचंबित होऊन बघतच राहिले!!
     wi-fi बंद करण्याची  धमकी!!! आमच्या वेळी तर, पोलीस मामांना बोलावेन, बाबा  रागावतील.. अश्या स्वरूपात धमकया असायच्या. आता मोबाईल, इंटरनेट, संगणक यांच्यासमोर कशाशीच बिशाद चालत नाही. मग असे वाटते कि या गोष्टी तर माणसाने स्वतःच्या सोयीसाठी निर्माण केल्या आहेत .. तर  याच्या आहारी जाणे कितपत योग्य आहेआणि लहानपणापासूनच जर मुलं मोबाईल मध्ये एवढी गुरफटून गेली  तर त्यांना बाहेरची दुनियादारी कधी आणि कशी कळणार? अशीच मुलं मग चार चौघांमध्ये जायला घाबरतात आणि कावरी बावरी होताना दिसतात. आता मुलांना असेच एक्कलकोंडे बनवायचे कि गरुडाच्या पिल्लासारखे धीट बनवायचे ते तुम्हीच ठरवा!!!

        मी माझे आवरून  नेहमीप्रमाणे ऑफिस ला जायला निघाले ,आज बऱ्याच दिवसांनी आकाशात  काळे ढग दाटून आले होते.. ते  काळे ढग पावसाळा जवळ आल्याची जणू आठवणच  करून देत होते .मग माझ्या लक्षात आले कि अरे  आज तर  जून ...म्हणजे पावसाची हजेरी हि  नक्की  .. आणि तिथूनच मनामध्ये विचारांची कालवाकालव सुरु झाली ...  एकामागून एक पुस्तकाची पाने जशी उलटून पहिल्या पानावर जावी तशी..
       अजून शाळेचा पहिला दिवस आठवतो.. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या कि जून च्या पहिल्या आठवड्यात शाळा सुरु   व्हायची . आणि त्याबरोबर मान्सून चे पण आगमन व्हायचे . शाळा सुरु होण्याआधी बाबा आम्हाला गावात घेऊन जायचेनवीन युनिफॉर्म .. नवीन दप्तर ... रेनकोट.. वह्या पुस्तक आणायला ... तेव्हा नवीन दप्तर आणि नवीन रेनकोट ची मजा   वेगळी असायची.. वह्या पुस्तकांमधून येणार सुगंध तर मन मोहून टाकायचा .. आणि कधी एकदा त्या करकरीत   वह्यांवर नवीन पेनाने नाव टाकते असे व्हायचे .. त्याकाळी शाई च्या पेन ची फॅशन होती.. आमच्या शिक्षिका तर शाईच्या पेनाचाच आग्रह धरायच्या.. त्यांच्या मते शाईच्या पेनाने ने अक्षर सुधारते .. माझे अक्षर तर प्रत्येक वर्षी बदलायचे.. मग तो कोणताही पेन का असेना..
         पावसातून घरी भिजून आले  कि आईबरोबर वाफाळलेला चहा घेत गप्पा मारण्यात स्वर्गप्राप्ती झाल्याचा  आनंद मिळे..चहाबरोबर कधी कधी तिखट मिठाचे पोहे तर कधी पातळ पोह्याचा चिवडा.. आणि बाबांच्या मनात आली कि   गरमा गरम कांदा भजी हे ठरलेले.. ओले केस घेऊन खिडकीतून त्या पावसाच्या सरीकडे एकसारखे बघत राहायचे.. आणि साथी  ला आकाशवाणी वर किशोर कुमारमहम्मद रफी यांची गाणी ऐकायची  ....
         रात्र झाली कि पावसाचा जोर आणखीनच वाढायचा.. जोराचे वादळ.. विजांचा कडकडाट.. ढगांचा गडगडाट ..  आणि त्यात MSEB  च्या कृपेने लाईट्स जायचे..आणि सगळीकडे काळोख व्हायचा . मग बाबा मला आणि माझ्या   भावाला घेऊन बालकनीमध्ये बसायचे.. मग आम्ही गावांच्या भेंड्या खेळायचो..आणि सगळ्या गावांची नावे घेऊन   संपली कि मग बाबा आम्हाला भूतप्रेतांच्या  गोष्टी सांगायचे .... लाईट्स येईपर्यंत आमचे हेच चालायचे..
       किती बेफिकीर राहायचो तेव्हा आम्ही !!!!.एवढ्या लहान वयात सुद्धा!! भीतीचा थोडा देखील लवलेश नव्हता..मग ते भूत असो कि जोरदार पाऊस.. कि काळोख .. आई बाबांच्या छत्रा खाली सगळेच आल्हाददायी  वाटायचे ..या   आठवणीने टचकन डोळ्यात पाणी आले .. आणि ते पाणी टिपेपर्यंत ऑफिस पर्यंत कसे पोहचले ते कळलेच नाही..